Belagavi

बेळगावात पर्यटन मार्गदर्शक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना सुवर्णसंधी

Share

पर्यटन विभागात पर्यटन मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांनी आपल्या कौशल्याचा वापर करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन बेळगाव पर्यटन विभागाचे प्रभारी सहसंचालक सदाशिव बडिगेर यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या वर्षासाठी पर्यटन विभागामार्फत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बेळगाव जिल्ह्यातील २८ तरुणांना विशेष टुरिस्ट किट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. बेळगाव येथील सुवर्णसौध समोर आयोजित एका साध्या समारंभात जिल्ह्यातील विविध तालुक्यातून निवड झालेल्या आणि यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींना या किटचे मोफत वितरण करण्यात आले.

“राज्य सरकारच्या पर्यटन विभागामार्फत निवडक लाभार्थ्यांना एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, आज त्यांना विभागाकडून आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. आगामी काळात हे सर्व प्रशिक्षित तरुण आपापल्या तालुक्यात मार्गदर्शक म्हणून कार्यरत होतील,” अशी माहिती पर्यटन विभागाचे सहसंचालक सदाशिव बडिगेर यांनी दिली.

याप्रसंगी पर्यटन विभागाचे अधिकारी प्रवीण केळगडे, सीमा गौडर, शशांक हिरेमठ, कीर्ती सोनटक्की, रत्नप्पा शेट्टीमनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

देशाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पर्यटन क्षेत्रात कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागामार्फत बेरोजगार तरुण-तरुणींना मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देणे ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, प्रशिक्षण घेतलेल्या या तरुणांना संबंधित तालुक्यातील पर्यटन स्थळांवर तात्पुरती नोकरी, मानधन किंवा विभागात कायमस्वरूपी रोजगाराची हमी मिळाल्यास सरकारचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी होईल, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Tags: