Chikkodi

येडूरमध्ये १ मार्चपासून रंगणार भव्य महाकुंभाभिषेक सोहळा

Share

येडूर येथे १ ते ६ मार्च या कालावधीत सामूहिक इष्टलिंग पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला देशाचे उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि दिग्गज राजकीय नेत्यांसह विविध पीठांचे जगद्गुरु उपस्थित राहणार आहेत.

येडूर येथील श्री वीरभद्र देवस्थानचे धर्माधिकारी आणि श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. १ मार्च रोजी सायंकाळी श्री सिद्धलिंग शिवाचार्य वेदागम संस्कृत पाठशाळेचा १२ वा वर्धापन दिन साजरा होईल. याप्रसंगी श्रीशैल, काशी, निडसोसी आणि होसपेठ येथील जगद्गुरुंचे सान्निध्य लाभणार असून कडगंची व श्रीरंगपट्टण येथील पूज्य महंतांचे नेतृत्व असेल. कर्नाटकचे कामगार मंत्री संतोष लाड या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील, तर चिक्कोडीचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले अध्यक्षस्थान भूषवतील. श्रीशैलचे आमदार बुड्डा राजशेखर रेड्डी यांची विशेष उपस्थिती असेल आणि अंबिकानगरच्या पूज्यांना ‘शिवाचार्य शिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असे डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

२ मार्च रोजी धर्मसमन्वय सोहळा, थीम पार्क आणि ‘श्री क्षेत्र येडूर’ लघुपटाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाचे सान्निध्य श्रीशैल, काशी आणि शिरहट्टीचे फकीर दिगालेश्वर स्वामी लाभणार आहेत. राज्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे थीम पार्कचे उद्घाटन करतील, तर भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र लघुपटाचे लोकार्पण करतील. याच दिवशी पंढरपूरचे विठ्ठल महाराज शिवकीर्तन करतील आणि सुभाष मामने यांना ‘दानवीर’ पुरस्कार दिला जाईल. तसेच डॉ. विजयलक्ष्मी बाळेकुंद्री यांचे विशेष व्याख्यान होईल, असे डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी म्हटले.

३ मार्च रोजी श्री भद्रकाळी-वीरभद्रेश्वर कल्याणोत्सव आणि ‘विश्वचेतना’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. खाण व भूविज्ञान मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण करतील. राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक डॉ. महांतेश किवूडसण्णवर यांना ‘विश्वचेतना’ पुरस्काराने गौरवण्यात येईल. या प्रसंगी खासदार प्रियांका जारकीहोळी, माजी मंत्री मुरगेश निराणी आणि शंकर बिदरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली.
४ मार्च रोजी महिलांच्या वतीने रौप्य रथोत्सव आणि गुग्गुळोत्सव पार पडेल, ज्याचे उद्घाटन नीलांबिका प्रकाश हुक्केरी करतील. सायंकाळी पुरवंता महामेळाव्यात ११ ज्येष्ठ पुरवंतांना ‘पुरवंत वीर’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमात हुबळीच्या तीन हजार मठाचे जगद्गुरु उपस्थित राहतील. माजी आमदार महांतेश कवटगीमठ आणि आमदार सिद्धू सवदी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल, असे डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी स्पष्ट केले.

५ मार्च रोजी वीरशैव लिंगायत धर्मोत्थान संमेलन आणि राजगोपुरांचे लोकार्पण होणार आहे. भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजगोपुरांचे लोकार्पण होईल, तर राज्यपाल थावरचंद गेहलोत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यात्री निवासाचे उद्घाटन करतील. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, एम.बी. पाटील, खासदार जगदीश शेट्टर, आमदार गणेश हुक्केरी आणि माजी मंत्री शशिकला जोल्ले उपस्थित राहतील. पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांना ‘विकास वीर’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली.

आमदार गणेश हुक्केरी यांनी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याची माहिती दिली. ६ मार्च रोजी ५ हजार सुवासिनी कृष्णा नदीवरून कुंभ घेऊन मिरवणुकीने मंदिरात येतील. पंचपीठाच्या जगद्गुरुंच्या हस्ते राजगोपुरांना महाकुंभाभिषेक केला जाईल. सायंकाळी कृष्ण आरती आणि लक्षदीपोत्सवाने या सहा दिवसीय सोहळ्याची सांगता होईल. या उत्सवात वारकरी आणि ब्राह्मण संप्रदायाचे २०० हून अधिक संत सहभागी होणार असून भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. हा एक सर्वधर्म कार्यक्रम असून सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश हुक्केरी यांनी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेला श्रीकांत उमराणी, रेणुका देवू, चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, अन्नदान शास्त्री, गुरुसिद्ध शिवाचार्य स्वामीजी, मठाधिपती सर, गौरीशंकर स्वामीजी, अंबिकानगर श्री, रेणुका शांतमल्ल स्वामीजी आणि मुत्तय्या तुबची उपस्थित होते.

Tags: