Belagavi

येळ्ळूर : सरकारी मराठी शाळेच्या ‘शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी’ स्मरणिकेचे प्रकाशन

Share

येळ्ळूर येथील १५० वर्षांची परंपरा असलेल्या सरकारी मराठी मॉडेल स्कूलच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा अहवाल आणि स्मरणिकेचे भव्य प्रकाशन करण्यात आले. शालेय आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमात महोत्सवाच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल स्कूलला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एप्रिल २०२५ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत अभूतपूर्व सोहळा पार पडला होता. या ऐतिहासिक कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तांत आणि आठवणींना उजाळा देणाऱ्या स्मरणिकेचे आज प्रकाशन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावजी महादेव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा. आनंद मेणसे यांनी या स्मरणिकेचे लोकार्पण करून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव केला.

यावेळी शतಕೋತ್ತर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष रावजी पाटील, निधी संकलन समितीचे सतीश पाटील आणि पत्रकार कृष्णा शहापूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक आर. एम. चलवादी यांनी कार्यक्रमाच्या अहवालाचे वाचन केले. शाळेच्या विकासासाठी आणि या महोत्सवासाठी सढळ हस्ते मदत करणाऱ्या प्रत्येक देणगीदाराचे अध्यक्षांनी आभार मानले. ही स्मरणिका शाळेत उपलब्ध असून शिक्षणप्रेमी आणि माजी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.

Tags: