Belagavi

बेळगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

Share

बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून नागरिक जीव मुठीत धरून वावरत आहेत. विशेषतः बसव कॉलनी परिसरात कुत्र्यांच्या उपद्रवामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रहिवाशांनी महानगरपालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे टोळके परिसरात हैदोस घालत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. शाळेत जाणारी मुले आणि पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही नागरिक रस्त्यावरील कुत्र्यांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकत असल्यामुळे ही समस्या अधिक जटील बनली आहे. याबाबत संबंधितांना विनंती केली असता वादाचे प्रसंग घडत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

या समस्येबाबत महानगरपालिका प्रशासनाला अनेकदा कळवूनही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. पालिकेच्या या दुर्लक्षित कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

जर प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बसव कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे.

Tags: