महाशिवरात्रीनिमित्त बेळगावमधील श्रीनगर येथे श्री शिवांजनेय सेवा विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले.


श्रीनगर येथील वीरराणी कित्तूर चन्नम्मा हाउसिंग सोसायटीच्या श्री शिवांजनेय सांस्कृतिक भवनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजप नेते डॉ. रवी पाटील यांनी या आरोग्य शिबिराचा शुभारंभ केला. महाशिवरात्रीनिमित्त केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवण्यात आला.

श्री शिवांजनेय सेवा विकास संस्थेने आयोजित केलेल्या या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून रक्तदाब, मधुमेह, नेत्रतपासणी आणि अस्थिरोगांशी संबंधित मोफत तपासणी करून सल्ला देण्यात आला. सकाळपासूनच नागरिकांनी तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती.

याप्रसंगी नगरसेविका लक्ष्मी महादेव राठोड, भाजप नेते महादेव राठोड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी आरोग्य पथकाद्वारे देण्यात आलेल्या सेवेचे विशेष कौतुक केले. शिवरात्रीच्या निमित्ताने आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. उद्या या ठिकाणी शिवलिंगाला अभिषेक आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.



Recent Comments