Belagavi

बिम्स महाविद्यालयाचा १०० टक्के निकालाचा नवा विक्रम

Share

बिम्स महाविद्यालयाने मिळवलेला १०० टक्के निकाल ही अभिमानास्पद बाब असून, विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन बेंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. तन्वीर अहमद नायकोडी यांनी केले.

बेळगाव येथील बिम्स सरकारी नर्सिंग महाविद्यालयात आज दीप प्रज्वलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले डॉ. तन्वीर अहमद नायकोडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नर्सिंग व्यवसायाची पवित्रता अधोरेखित केली. आजपासून तुम्ही निस्वार्थी भावनेने व्यावसायिक जीवनात पदार्पण करत असून, काळानुसार स्वतःला बदलून प्रगती साधा. भारतीय परिचारिकांना जगभरात मोठी मागणी असून देश आणि राज्यात नर्सिंग कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती होणे आवश्यक असल्याचे डॉ. तन्वीर अहमद नायकोडी यांनी म्हटले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव माळगी यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आलेख मांडला. चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, तब्बल ९९ टक्के विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती डॉ. नामदेव माळगी यांनी दिली.

बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या सोहळ्याला बिम्सच्या अधिकारी रेश्मा ताळीकोटी, शिल्पा वाली आणि प्राचार्य डॉ. उमेश कुलकर्णी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. ईरण्णा पल्लेद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदीश एस. गाणगी, आर.एम.ओ. डॉ. सरोजा तिगडी, नर्सिंग अधीक्षक कांचनमाला सूर्यवंशी आणि नर्सिंग स्कूलचे प्राचार्य डॉ. प्रकाश डी. कोडली यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

Tags: