Belagavi

​दिव्यांगांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात ‘विशेष तरतूद’ करणार : मंत्री हेब्बाळकर

Share

दिव्यांगांचा जगण्याचा उत्साह आम्हास नवी प्रेरणा देतो. आगामी अर्थसंकल्पात दिव्यांग मुलांसाठी विशेष योजना राबवल्या जातील, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.


​जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बेळगावच्या जिल्हा क्रीडांगणावर आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी क्रीडा ध्वजारोहण केले आणि स्वतः गोळाफेक करून खेळाडूंचा उत्साह वाढवला.

​दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे सरकारचे प्रमुख ध्येय असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. दिव्यांगांचे निवृत्तीवेतन, सोयी-सुविधा आणि नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व विभागांची बैठक बोलावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच दिव्यांग मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची सेवा अनन्यसाधारण असून, त्यांचा विभागामार्फत विशेष सत्कार केला जाईल, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जाहीर केले.

​या कार्यक्रमाला क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. श्रीनिवास आणि महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक चेतनकुमार एम. एन. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर यांनी प्रास्ताविकात विभागाच्या योजनांची माहिती दिली. क्रीडा स्पर्धेदरम्यान दिव्यांग मुलांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा वाढदिवस साजरा केला, हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

​या सोहळ्याला जिल्हा निरुपणाधिकारी अण्णाप्पा हेगडे, कांचना आमटे, राममूर्ती के. पी., सुमित्रा डी. बी. आणि वामन कट्टी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध विशेष शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या क्रीडा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: