Belagavi

​हिडन कॅमेरा प्रकरणातून धक्कादायक माहिती उघड

Share

​महिला अधिकाऱ्याच्या घरात चोरून कॅमेरा बसवून त्यांचे खासगी क्षण टिपणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाच्या तपासात आरोपींच्या मोबाईलमध्ये १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून लाखोंच्या खंडणीसाठी हे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बेळगावातील एका जिल्हा स्तरावरील महिला अधिकाऱ्याच्या घरातील बल्ब होल्डरमध्ये आरोपींनी सूक्ष्म कॅमेरा लपवला होता. या माध्यमातून टिपलेल्या खासगी व्हिडिओचा वापर करून आरोपींनी ५० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास आक्षेपार्ह चित्रण सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

​या प्रकरणी पोलिसांनी समीर शेख, अब्दुल रशीद मकानदार आणि मोहम्मद बाळेकुंद्री या तिघांना अटक केली आहे. माळमारुती पोलिसांनी आरोपींचे मोबाईल तांत्रिक तपासासाठी ताब्यात घेतले असता, त्यात मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह व्हिडिओंचा साठा आढळून आला. मोबाईल डेटा रिस्टोर केल्यानंतर आणखी एका महिला अधिकाऱ्याचे खासगी व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत.

​आरोपींनी चौकशीदरम्यान अनेक महिलांना अशाच प्रकारे ब्लॅकमेल केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा तपास आता अधिक सखोल केला जात असून, या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे याची माहिती पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

Tags: