कराटे स्पर्धेत कांस्य पदक विजेती माहि कांग्राळकर आणि क्रिकेटमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या झोया काझी यांचा बेळगाव डीडीपीआय कार्यालयात शानदार सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रातील बारामती येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित अखिल भारतीय स्तरावरील कराटे स्पर्धेत बेळगावच्या वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी माहि कांग्राळकर हिने राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक पटकावले आहे. माहिच्या या घवघवीत यशाची दखल घेत बेळगावच्या डीडीपीआय लिलावती हिरेमठ यांनी आपल्या कार्यालयात तिचा सत्कार करून गौरव केला.
या यशामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना लिलावती हिरेमठ यांनी व्यक्त केली.
याच शाळेची दुसरी प्रतिभावान खेळाडू झोया काझी क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. हैदराबाद आणि पुणे येथे झालेल्या १९ वर्षाखालील महिला क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक संघाकडून खेळल्यानंतर, आता झोयाची बेंगळुरू येथे होणाऱ्या २३ वर्षाखालील वयोगटातील निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल डीडीपीआय यांनी झोयाचेही कौतुक केले.
या प्रसंगी क्रिकेट प्रशिक्षक नागराज भगवंतनवर, शाळेचे प्राचार्य रुबेन, उपप्राचार्या रिचेल राणी आणि व्यवस्थापन मंडळाने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.


Recent Comments