बेळगावमधील प्रतिष्ठित केएलई उच्च शिक्षण आणि संशोधन अकादमीच्या (काहेर) कुलगुरूपदी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. संदीप श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी आज अधिकृतपणे केएलई संस्थेच्या कुलगुरूपदाची जबाबदारी स्वीकारली. यापूर्वी त्यांनी वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेत कार्यकारी संचालक म्हणून कार्य केले असून, मेयो क्लिनिक आणि क्लीव्हलँड क्लिनिकसारख्या जागतिक संस्थांसोबतही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे केएलई संस्थेचा शैक्षणिक दर्जा जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. संदीप श्रीवास्तव हे केवळ प्रशासक नसून एक नामवंत संशोधक देखील आहेत. त्यांनी जखमांच्या उपचारासाठी ‘STARS’ थेरपीचा शोध लावला असून त्यांचे १२५ हून अधिक संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत संस्थेत नाविन्यपूर्ण बदल घडवून आणणे आणि संशोधनात आघाडी मिळवणे, हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी सांगितले.
केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी नूतन कुलगुरूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Recent Comments