Chikkodi

चिकोडी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची दुचाकीवरून गस्त

Share

चिकोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी आणि तहसीलदार राजेश बुर्ली यांनी आज पहाटे दुचाकीवरून शहराचा दौरा करत स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. उभयतांच्या या ‘सरप्राईज व्हिजिट’मुळे यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली

उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी चिकोडी शहरातील विविध वस्त्या, बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर दुचाकीवरून फिरून स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी थेट सामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि अनेक समस्यांवर जागीच निकाल लावण्याचे आदेश दिले.

दौऱ्यादरम्यान या अधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालय आणि माता-बाल रुग्णालयाला भेट दिली. तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करून रुग्णालयीन सोयीसुविधांची तपासणी केली. रुग्णालयातील उत्तम व्यवस्था आणि रुग्णसेवेबद्दल त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या अनपेक्षित दौऱ्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या अचानक केलेल्या पाहणीमुळे आगामी काळात शहरातील नागरी सुविधांमध्ये सकारात्मक बदल होतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे सुभाष संपगावी यांनी म्हटले आहे.

Tags: