Belagavi

बेळगावात सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्साहात

Share

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त बेळगावातील शिवाजी उद्यानात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी बेळगाव शहर आणि परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना मानवंदना दिली.

शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार बांधवांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यात मराठा समाजासह मराठी भाषिकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

बेळगाव परिसरात मराठा समाजाची लोकसंख्या मोठी असल्याने शासकीय शिवजयंती साजरी करताना समाजातील प्रमुखांना विश्वासात घेतले पाहिजे, अशी आग्रही मागणी समन्वयक किरण जाधव यांनी केली. या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील वर्षापासून १९ फेब्रुवारीची शिवजयंती समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून साजरी करण्याचे आश्वासन दिले, असे किरण जाधव यांनी सांगितले.

शिवरायांचे चारित्र्य आणि विचार प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया महिला नेत्या रेणू किल्लेकर यांनी व्यक्त केली. तसेच प्रत्येक घरात शिवचरित्र असायला हवे, असे आवाहन गुणवंत पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला ॲड. अमर येळ्ळूरकर, सागर पाटील, ह.भ.प. शंकर बबली महाराज, सुनील बोकडे, सुनील जाधव, राजन जाधव, महादेव पाटील, विपुुल जाधव, सचिन पाटील यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित होते.

Tags: