बेळगाव शहराच्या उपनगरातील शिंदोळी गावात कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या तब्बल ११ एकर क्षेत्रातील अवैध ले-आउटवर बुडाच्या अधिकाऱ्यांनी आज बुलडोझर चालवून कारवाई केली.


शिंदोळी गावातील सर्व्हे नंबर १३१/१, २, ३, ४, ५ आणि ६ मधील सुमारे ११ एकर जागेत कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय हे ले-आउट तयार करण्यात आले होते. प्राधिकरणाचे नियम धाब्यावर बसवून तयार केलेले रस्ते, गटारी आणि इतर पायाभूत सुविधांचे बांधकाम बुडाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने हटवले. अशा अनधिकृत ले-आउटमध्ये प्लॉट खरेदी करून नागरिकांनी आपली फसवणूक करून घेऊ नये, असा इशारा यावेळी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या मोठ्या कारवाईचे नेतृत्व बुडा आयुक्त शकील अहमद यांनी केले. यावेळी टीपीएम बी. व्ही. हिरेमठ, एईई मंजुश्री, टीपी शिवकुमार, जेई प्रसन्न, बाळिगड्डी, सर्व्हेअर विद्या आणि पोलीस कर्मचारी मोठ्या बंदोबस्तासह उपस्थित होते. तसेच निळजी ग्रामपंचायत विकास अधिकारी श्रीदेवी हिरेमठ यादेखील मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. आगामी काळात बेळगावच्या आसपास कोणत्याही अवैध ले-आउटला थारा दिला जाणार नाही आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.


Recent Comments