Belagavi

बोगस पीएचडी रॅकेटचा पर्दाफाश करा; बेळगावात अभाविपचे भव्य आंदोलन

Share

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले बोगस पीएचडी रॅकेट आणि अतिथी अधिव्याख्यात्यांच्या नियुक्तीतील घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी आज बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी भव्य निदर्शने केली.

आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभाविपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. कर्नाटकात बोगस पीएचडी स्कॅम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. युजीसी (UGC) नियमांनुसार संशोधन करून पदवी मिळवण्याऐवजी, पैशांचे आमिष दाखवून बनावट प्रमाणपत्रे खरेदी केली जात आहेत. कोप्पळ, विजयपूर, हावेरी, यादगीर आणि जमखंडी भागात अशा प्रकरणांचे प्रमाण अधिक असून इतर राज्यांतूनही बोगस पीएचडी पदव्या मागवल्या जात आहेत. या रॅकेटमागे सक्रिय असलेल्या एजंटना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

विद्यापीठांमधील रिक्त पदांबाबत आवाज उठवताना अभाविप म्हणाली की, राज्यातील ३२ विद्यापीठांमध्ये एकूण ९,२९२ पदे रिक्त असून ती त्वरित भरली पाहिजेत. प्राचार्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर होत असून बेकायदेशीरपणे अतिथी अधिव्याख्यात्यांची नियुक्ती केली जात आहे. बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या प्राचार्यांना बडतर्फ करावे आणि घोटाळा उघड होण्याच्या भीतीने राजीनामा देणाऱ्या अधिव्याख्यात्यांवर क्रिमिनल केस दाखल करावी, अशी मागणी अभाविपचे शहर सचिव प्रथमगौडा पाटील यांनी केली.

या आंदोलनात अभाविपचे शेकडो पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.

Tags: