Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगावला आध्यात्मिक भेट

Share

महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त बेळगावच्या जनतेला मोठी आध्यात्मिक भेट दिली आहे. सह्याद्री नगर येथे नूतन बांधण्यात आलेल्या श्री महाबळेश्वर मंदिराचे उद्घाटन करून त्यांनी राज्याच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली.

बेळगावच्या सह्याद्री नगरमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे २ कोटी रुपये खर्चून जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री महाबळेश्वर मंदिराचा उद्घाटन सोहळा आज दिमाखात पार पडला. शनिवारी मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर बोलताना मंत्री म्हणाल्या की, “लोकांची शांतता आणि समाधान माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात आतापर्यंत १५० हून अधिक मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला असून, महाशिवरात्रीच्या या पवित्र काळातच शिवमंदिराचे उद्घाटन होत आहे, याचे मला मोठे समाधान वाटत आहे.”

आज मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा वाढदिवस असल्याने मंदिर परिसरात विशेष पूजा आणि होमहवन आयोजित करण्यात आले होते. होमहवनात सहभागी होऊन मंत्र्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी संकल्प केला. या कार्यक्रमात मृणाल हेब्बाळकर, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे भव्य शिवमंदिर आता सह्याद्री नगरमधील एक प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जात आहे.

Tags: