Belagavi

बेळगावात क्रीडाभारती अखिल भारतीय नियामक मंडळ बैठकीचा शुभारंभ

Share

बेळगावमधील मंडोळी रोड येथील साईराज लॉनमध्ये क्रीडाभारती अखिल भारतीय नियामक मंडळ बैठकीला शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी उत्साहात प्रारंभ झाला. या तीन दिवसीय बैठकीत देशभरातील पदाधिकारी सहभागी झाले असून आगामी काळात भारतीय क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडाभारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, संघटनमंत्री प्रसाद महानकर आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले. चंद्रशेखर जहागिरदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या बैठकीत प्रामुख्याने २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणे आणि क्रीडा क्षेत्रासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याबाबत सखोल चर्चा व चिंतन करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला कर्नाटक राज्य क्रीडाभारतीचे अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, उपाध्यक्ष सुधीर धामणकर यांच्यासह देशभरातून आलेले उमेश कुमार, माधव बेहरा, रजत दीक्षित आणि चैतन्य कुमार कश्यप यांसारखे दिग्गज पदाधिकारी उपस्थित आहेत. आगामी तीन दिवसांत क्रीडा विकासाचे विविध टप्पे आणि धोरणात्मक निर्णयांवर या ठिकाणी मंथन होणार आहे.

Tags: