बेळगाव महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया अचानक थांबवण्यात आल्याने अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सरकारच्या नव्या नियमांमुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आज माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दाद मागण्यात आली.

बेळगाव महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आज अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. सरकारच्या नवीन कायद्यानुसार अभियंत्यांच्या परवाना नूतनीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी चक्क जुन्या शालेय कागदपत्रांची सक्ती केली जात असल्याने गेल्या २०-३० वर्षांपासून सेवा देणाऱ्या ज्येष्ठ अभियंत्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. तसेच डिप्लोमा आणि जेओसी धारक अभियंत्यांच्या कामाची मर्यादा केवळ १००० स्क्वेअर फुटांपर्यंत मर्यादित केल्याने अभियंत्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे.

निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विनायक गुंजटकर यांनी प्रशासकीय भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. “अ” आणि “ब” खात्याशी संबंधित २०२४ पूर्वीच्या इमारती नियमानुसार समाविष्ट केल्या पाहिजेत. तसेच महानगरपालिकेत काम करणाऱ्या प्लंबरकडूनही शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र मागितले जात आहे; मुळात अल्पशिक्षित असलेल्या कामगारांनी अशी कागदपत्रे कोठून आणायची, असा सवाल विनायक गुंजटकर यांनी उपस्थित केला. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारून याप्रश्नी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी बेळगाव महानगरपालिकेचे शेकडो अभियंते आणि संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments