Belagavi

बेळगावात दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळून १३ दुचाकी जप्त

Share

बेळगाव शहरात सातत्याने होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात एपीएमसी पोलिसांना मोठे यश आले असून दोन आंतरजिल्हा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. अवघ्या दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत पोलिसांनी ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत.

बेळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाच एपीएमसी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत राबवलेल्या या मोहिमेत दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या गाड्या जप्त केल्या आहेत.

बेळगावमधील कंग्राळी के.एच येथील रहिवासी दीपक भागानगर यांची दुचाकी १० फेब्रुवारी रोजी चोरीला गेल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यू.एस. अवटी यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे हुक्केरी तालुक्यातील बेलद बागेवाडी येथील उमेश बागेवाडी आणि गुडस गावातील मौला हसनसाब हलकर्णी या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या १३ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये ११ हिरो स्लेंडर आणि २ हिरो एचएफ डिलक्स गाड्यांचा समावेश आहे. या धाडसी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे पीएसआय एस.आर. मुत्तत्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त बोरासे भूषण गुलाबराव यांनी भरभरून कौतुक केले आहे. या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना मोठा चाप बसला आहे.

Tags: