Belagavi

बेळगाव स्मार्ट सिटीला ‘सिटीस २.०’चे बळ; महापौर आणि नगरसेवकांचा जयपूरमध्ये विकासमंत्र

Share

केंद्र सरकारच्या ‘सिटीस २.०’ योजनेसाठी बेळगावची निवड झाल्यानंतर, या प्रकल्पांच्या अभ्यासासाठी महापौर आणि नगरसेवकांच्या पथकाने जयपूरचा दौरा केला आहे.

केंद्राच्या नगरविकास मंत्रालयाच्या कठीण स्पर्धेत बेळगाव स्मार्ट सिटीची ‘सिटीस २.०’ योजनेसाठी निवड होणे ही शहरासाठी मोठी गौरवाची बाब आहे. या योजनेअंतर्गत कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी आणि युरोपियन युनियनच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर मंगेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जयपूरमधील कचरा विल्हेवाट प्रकल्प आणि ‘एअर प्युरिफायर प्लांट’च्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.

या दौऱ्याबाबत माहिती देताना महापौर मंगेश पवार म्हणाले की, “सिटीस २.० योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरला आहे. विशेष म्हणजे, बेळगावमधील काही चांगल्या पद्धती जयपूरमध्येही स्वीकारल्या जात आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

जयपूरमधील शाश्वत विकासाची ही मॉडेल्स बेळगावात राबवून शहराच्या स्वच्छतेचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार असल्याचा विश्वास सभागृह नेते हनुमंत कोंगाळी यांनी व्यक्त केला.

यावेळी उपमहापौर वाणी जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, “गेल्या वेळी आम्ही इंदूर आणि चंदीगडचा अभ्यास दौरा केला होता, तर या वेळी जयपूरमधील विकासकामांचा अभ्यास करत आहोत. येथील यशस्वी प्रकल्पांचे अवलोकन करून बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बेळगाव महानगरपालिका पूर्ण प्रयत्न करेल”अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: