मालवाहू क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या पियाजिओ कंपनीचे बहुप्रतिक्षित ‘APE XTRA BADA 700’ हे वाहन आता बेळगावच्या बाजारपेठेत दाखल झाले आहे. हायटेक मोटर्सतर्फे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात डीसीपी नारायण भरमणी यांच्या हस्ते या नूतन वाहनाचे अनावरण करण्यात आले.


बेळगावच्या आर.के. लॉन्समध्ये हायटेक मोटर्स अँड ऑटोमोबाईल्सतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘दमदार पॉवर, शानदार कमाई’ या घोषवाक्यासह लाँच झालेल्या या वाहनाचे उद्घाटन डीसीपी नारायण भरमणी यांनी केले. हायटेक मोटर्सचे संचालक राजेंद्र देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना डीसीपी नारायण भरमणी यांनी पियाजिओ कंपनीच्या योगदानाचे कौतुक केले. छोटे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना बळ देण्यासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरेल, असे नारायण भरमणी यांनी म्हटले.

पियाजिओ कंपनीची ही वाहने केवळ एक साधन नसून ती रोजगार देणारा मोठा स्रोत आहेत, असे पियाजिओ इंडियाचे प्रादेशिक प्रमुख नटराजन पद्मकुमार यांनी नमूद केले. हायटेक मोटर्सने बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार वाहनांची विक्री केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. भारतीय रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करून हे कमी देखभालीचे वाहन तयार करण्यात आल्याचे नटराजन पद्मकुमार यांनी सांगितले.
‘APE XTRA BADA 700’ हे वाहन ७५० किलोपर्यंत वजन वाहून नेण्यास सक्षम असून ते शहरी आणि निमशहरी भागासाठी वरदान ठरेल, अशी माहिती हायटेक मोटर्सचे संचालक राजेंद्र देसाई यांनी दिली. हे वाहन खरेदी करणे म्हणजे स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करण्यासारखे आहे, असे राजेंद्र देसाई यांनी म्हटले.

केवळ ३ लाख ४२ हजार रुपयांत हे वाहन उपलब्ध असून यामध्ये चारचाकी वाहनाची क्षमता तीनचाकीच्या रूपात देण्यात आली आहे. हे वाहन शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास संचालक राजेश भोसगी यांनी व्यक्त केला.
पियाजिओ ‘APE XTRA BADA 700’ हे वाहन मालवाहू क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. या वाहनात शक्तिशाली ७०० डीआय इंजिन असून त्याची ओढण्याची क्षमता जबरदस्त आहे. तसेच, ७ फूट लांब ‘बडा डेक’ असल्यामुळे जास्त माल सहजपणे वाहून नेणे सोयीचे ठरते. चारचाकी वाहनांच्या तुलनेत हे वाहन अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध असून, याचा देखभालीचा खर्च कमी आणि इंधन कार्यक्षमता अधिक असल्याची माहिती आदर्श यांनी दिली.
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पहिल्या वाहनाचे वितरण करण्यात आले. हायटेक मोटर्सचे संचालक विनयकुमार बाळिकायी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला पियाजिओ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, बँकिंग भागीदार, वाहतूकदार आणि हायटेक मोटर्सचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments