प्रेमाला जातीपातीचे बंधन नसते, हेच बेळगावमधील या प्रेमीयुगुलाने सिद्ध केले आहे. घरच्यांचा तीव्र विरोध असूनही, हुबळी आणि गोकाकच्या या जोडीने संविधान निर्मात्यांच्या साक्षीने आणि युवा कर्नाटक भीमसेनेच्या सहकार्याने सप्तपदी पूर्ण केल्या आहेत.

बेळगावमधील डॉ. आंबेडकर उद्यान आज एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार ठरले. प्रेमीयुगुलाच्या संकटात धावून येत युवा कर्नाटक भीमसेनेचे अध्यक्ष प्रवीण मादार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या ११ व्या विवाहाचे आयोजन केले. गोकाक तालुक्यातील उप्पार समाजाचा गोपाल हारूगेरी आणि हुबळी तालुक्यातील वाल्मिकी समाजाची सोनिया नायक यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, आंतरजातीय विवाहामुळे दोन्ही कुटुंबांतून याला जोरदार विरोध होत होता. अखेर घरच्यांची समजूत काढणे कठीण झाल्याने या जोडीने भीमसेनेकडे मदतीची मागणी केली होती.
आम्ही दोघे शेतात काम करतो आणि गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होतो. मात्र केवळ आंतरजातीय विवाह म्हणून घरच्यांचा याला विरोध होता. प्रवीण मादार यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य करून हे लग्न लावून दिले, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि आता आम्ही सुखाने संसार करू, अशी भावना गोपाल हारूगेरी याने व्यक्त केली.
आमच्या प्रेमविवाहासाठी घरी कोणाचाही पाठिंबा नव्हता, मात्र आज प्रवीण मादार यांच्या मदतीने डॉ. बाबासाहेबांच्या उपस्थितीत आमचे लग्न पार पडले, असे सोनिया नायक हिने सांगितले.
या नवनियुक्त दांपत्याचे आयुष्य सुखाचे जावो. दोन्ही कुटुंबांनी त्यांना शांततेने जगू द्यावे आणि संबंधित पोलीस ठाण्यांनी या प्रेमीयुगुलाला संरक्षण द्यावे, असे आवाहन प्रवीण मादार यांनी केले.


Recent Comments