देश उभारणीमध्ये एनसीसी कॅडेट्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केल्यास भारतीय लष्करात उच्च पदावर जाण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे मार्गदर्शन २६ कर्नाटक एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील दागरा यांनी केले.

बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात (RDC) सहभागी झालेला धीरज भाविमने आणि राष्ट्रीय सैनिक शिबिरात चमकलेला ओंकार लोगावी यांचा महाविद्यालयातर्फे भव्य सत्कार करण्यात आला. आयुष्यात मोठे ध्येय ठेवा. ज्यांच्याकडे एनसीसीचे ‘सी’ प्रमाणपत्र आहे, त्यांना लष्करात विशेष सवलती मिळतात. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी प्रगती आहे, अशा शब्दांत कर्नल सुनील दागरा यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनामनी यांनी सांगितले की, महाविद्यालय क्रीडा आणि एनसीसीसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवत असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनामुळे लिंगराज महाविद्यालयाचे कॅडेट्स आज राष्ट्रीय पातळीवर नाव उज्ज्वल करत आहेत, अशी प्रतिक्रिया एनसीसी अधिकारी मेजर महेश गुरनगौडर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला हॉटेल उद्योजक संतोष शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments