Belagavi

वडगावमधील शतकाहून जुन्या ऐतिहासिक विहिरीला मिळणार पुनरुज्जीवन

Share

बेळगावमधील वडगाव गावातील जीवनवाहिनी असलेल्या १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पॅस फाउंडेशन सरसावले आहे. ए.के.पी. फेरोकास्ट संस्थेच्या सीएसआर निधीतून या पारंपरिक जलस्त्रोताला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

कुरुंदवाड सरकारकडून बांधण्यात आलेली ही दगडी विहीर त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. एकेकाळी संपूर्ण वडगाव गावाला पिण्याचे पाणी पुरवणारी ही विहीर वर्षभर नैसर्गिक पाझरांनी भरलेली असायची. मात्र, कालांतराने देखभालीअभावी ही विहीर पूर्णपणे दुर्लक्षित झाली होती. आता हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि स्थानिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पॅस फाउंडेशनने या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे.

बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार, ए.के.पी. फेरोकास्टचे व्यवस्थापकीय संचालक पराग भंडारे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या योजनेला सुरुवात झाली. पॅस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही विहीर पुन्हा कार्यान्वित झाल्यास पर्यावरण रक्षणासोबतच समाजाला शाश्वत जलसंपत्ती उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Tags: