Chikkodi

चिकोडी तालुक्यातील ४ उपसा सिंचन योजनांसाठी २ कोटींचा निधी मंजूर

Share

चिकोडी तालुक्यातील इंगळी, एकसंबा आणि यडूरवाडी या गावांमधील ४ उपसा सिंचन योजनांच्या एकूण १५९ एकर जमिनीसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी दिली.

एकसंबा येथे मंजुरी पत्रांचे वितरण करताना प्रकाश हुक्केरी बोलत होते. या भागातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू जमिनीसाठी सिंचन योजनेची मागणी केली होती. त्यानुसार आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून इंगळी येथील दोन, एकसंबा येथील एक आणि यडूरवाडी येथील एक अशा चार योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामांच्या निविदा काढून तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत इंगळी येथील मोहन पाटोळे, विनायक चौगुले, एकसंबा येथील तानाजी पवार, यडूरवाडी येथील सदाशिव सावळे आदींच्या क्षेत्रासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनांमुळे शाश्वत पाण्याची सोय होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे हुक्केरी यांनी नमूद केले.

यावेळी आमदार गणेश हुक्केरी, हुवण्णा चौगुला, रमेश मुरचित्टे, चंद्रकांत लंगोटे, विश्वनाथ माने, संजू पिराजे, अजित किल्लेदार, शिवाजी पवार, गजू चिनुमने, सदाशिव कुंभार यांच्यासह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

Tags: