Belagavi

बेळगावच्या एमएलआयआरसी केंद्रात ‘मराठा दिन’ उत्साहात साजरा

Share

बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये ‘मराठा दिन’ अत्यंत शिस्तबद्ध आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून अग्निवीरांच्या चित्तथरारक साहसी प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बेळगावच्या एमएलआयआरसीमध्ये आयोजित मराठा दिनानिमित्त आज पहाटे ‘शरकत युद्ध स्मारका’वर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना वीरमरण वंदन करण्यात आले. रेजिमेंटचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी या कार्यक्रमाचे नेतृत्व केले. यावेळी लष्करी अधिकारी, जवान आणि माजी सैनिकांनी उपस्थित राहून रेजिमेंटच्या शौर्याचा आणि त्यागाचा वारसा जपण्याचा संकल्प केला. याच कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या युद्धकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून जवानांचे साहस आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले.

यावर्षी अग्निवीरांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम राबवण्यात आली होती. तुर्कमट्टी संरक्षण भूमीपासून रेजिमेंटल सेंटरपर्यंत सुमारे १,००० हून अधिक अग्निवीरांनी काढलेले संचलन हे त्यांच्या शारीरिक क्षमतेचे आणि प्रबळ देशप्रेमाचे प्रतीक ठरले. यानंतर लष्करी मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

सुभेदार तानाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ला सर करताना बलिदान दिले असून त्यांच्या पराक्रमाची प्रेरणा देशाच्या सैनिकांना मिळावी, या उद्देशाने त्यांचा बलिदान दिन ‘मराठा दिन’ म्हणून साजरा केला जातो, असे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी सांगितले.

या सोहळ्याला मृणालिनी मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आणि मान्यवर उपस्थित होते. त्यांनी लष्करी शिस्तीचे आणि जवानांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.

Tags: