चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावातील सरकारी मराठी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळेत आयोजित केलेला ‘मुलं आणि त्यांचा आठवडी बाजार’ अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चक्क व्यापाऱ्यांची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली.

या वैशिष्ट्यपूर्ण बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. पालक आणि ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केला. तसेच भेळ, पाणीपुरी, वडापाव, पोहे आणि पराठा अशा चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.
केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर एक उत्तम व्यापारी मेळावा म्हणून या बाजाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेच्या आवारात ३५ हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. अवघ्या काही तासांतच या बाजारात हजारो रुपयांची उलाढाल झाली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्ये दिसून आली.

विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान आणि संवाद कौशल्य वाढवणे, भविष्यातील आव्हानांसाठी त्यांना सज्ज करणे आणि अनुभवातून शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. अभ्यासाव्यतिरिक्त अशा व्यावहारिक उपक्रमांमुळे मुलांना नवीन अनुभव मिळत असून, पालकांनीही शाळेच्या या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले आहे.


Recent Comments