बेळगावच्या क्रिकेट गुणवत्तेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. आंध्रप्रदेशात होणाऱ्या दक्षिण विभागीय १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची घोषणा करण्यात आली असून, बेळगावच्या ‘नीना स्पोर्ट्स क्लब’चा खेळाडू अजय लमाणी याने राज्य संघात स्थान मिळवले आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय बलाढ्य संघ जाहीर केला आहे. २७ जानेवारीपासून आंध्रप्रदेशातील विजयनगरम येथे ही स्पर्धा सुरू होत असून, या संघात अजय लमाणीची निवड यष्टीरक्षक म्हणून करण्यात आली आहे. समर्थ सुरेश या संघाचे नेतृत्व करणार असून संघात पवनदीप भरडकणे, प्रभाव पायडा यांसारख्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश आहे.
बेळगावच्या लव्हडेल सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी असलेला अजय लमाणी नीना स्पोर्ट्स क्लबमध्ये सराव करतो. प्रशिक्षक मजीद मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली अजयने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या संघासोबत प्रशिक्षक म्हणून आदित्य सागर, व्यवस्थापक म्हणून महालिंग आणि फिजिओथेरपिस्ट म्हणून विनय कुमार काम पाहणार आहेत. बेळगावच्या या पुत्राने मिळवलेल्या यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून त्याचे कौतुक होत आहे.


Recent Comments