Belagavi

बेळगावात फिल्मी स्टाईलने चालत्या ट्रकवर चढून चालकावर खुनी हल्ला

Share

बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरात भररस्त्यात रक्ताचा सडा पडला आहे. अपघाताचा बदला घेण्यासाठी आठ जणांच्या टोळीने चालत्या ट्रकचा पाठलाग करून चालकावर चाकूने सपासप वार केले. या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे.

रुक्मिणी नगर येथील रहिवासी अयाज सवणूर (३६) असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. हिंडलगा जवळ अयाजच्या ट्रकचा एका कारला धक्का लागला होता. अपघातानंतर ट्रक न थांबवता पुढे नेल्याच्या रागातून आठ जणांच्या टोळीने फिल्मी स्टाईलने ट्रकचा पाठलाग केला. क्लब रोडवरील शंकरानंद पुतळ्याजवळ या टोळीने ट्रकला ओव्हरटेक करून चालत्या ट्रकमध्ये प्रवेश केला आणि अयाजच्या मांड्या, कान, पाठ आणि डोक्यावर चाकूने वार केले.

या हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांनी ट्रकवर दगडफेक करून काचा फोडत धुमाकूळ घातला. गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अयाजला तातडीने खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून पालकांनी हंबरडा फोडला.

गुजरातहून माल भरून बेळगावमार्गे शिंनोळीला जाताना हा चाकू हल्ला आणि दगडफेक करण्यात आली. हल्लेखोरांनी पाठलाग केला असावा, असे दिसते. वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाले असून चालकाला गंभीर दुखापत झाली आहे, अशी माहिती ट्रक मालकाने दिली.

या घटनेची माहिती आम्हाला लोकांनी फोनवरून दिली. आम्ही घटनास्थळी पोहोचेपर्यंत पोलीस दाखल झाले होते. हल्लेखोर कोण होते, याबद्दल आम्हाला माहिती नाही. हा चालक गेल्या १८-२० वर्षांपासून आमच्याकडे काम करत आहे. याप्रकरणी आम्ही तक्रार दाखल केली असल्याचे मुस्तफा सवणूर यांनी सांगितले.

कॅम्प पोलीस आणि ‘सोको’ पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आरोपींच्या अटकेसाठी जाळे पसरवले आहे. कॅम्प पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Tags: