आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेल्या रेड्याचा पहिला वाढदिवस साजरा करून चिक्कलवाळ गावातील एका तरुणाने प्राण्यांबद्दलच्या प्रेमाचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. चिक्कोडी तालुक्यातील चिक्कलवाळ गावात हा आगळावेगळा सोहळा पार पडला.


गावातील शेतमजूर संजय रामचंद्र सठाले (३०) यांनी आपल्या घरी पाच म्हशी पाळल्या आहेत. ऊस तोडणी हंगामात मजुरी करणाऱ्या संजय यांच्याकडे केवळ १० गुंठे जमीन असून ते इतरांच्या शेतातून चारा आणून आपल्या जनावरांचे संगोपन करतात. त्यांच्याकडे असलेल्या गुजरातच्या मुर्रा जातीच्या म्हशीने जाफरा जातीच्या रेड्याला जन्म दिला आहे.


या देखण्या रेड्याला खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी एक लाख रुपयांची ऑफर दिली होती, मात्र अविवाहित असलेल्या संजय यांनी त्याला विकण्यास साफ नकार दिला. मी या रेड्याला कोणत्याही परिस्थितीत विकणार नाही आणि माझ्या जीवापाड त्याचे मुलाप्रमाणे संगोपन करेन, अशी भावनिक प्रतिक्रिया संजय सठाले यांनी दिली.
या रेड्याचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी १० किलोचा केक कापून गावकऱ्यांसोबत आनंद साजरा करण्यात आला. इतकेच नव्हे तर ३०० लोकांसाठी जेवणावळीचा बेत आखला होता आणि यानिमित्ताने गावात भजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. सीमावर्ती भागात या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची जोरदार चर्चा रंगली आहे.


Recent Comments