Belagavi

भव्य शोभायात्रेने सिद्धिविनायकाचे मंदिरात आगमन

Share

बेळगाव येथील न्यू गुडशेड रोडवरील श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त नूतन गणेश मूर्तीची भव्य शोभायात्रा अत्यंत उत्साहात पार पडली. शेकडो भक्तांचा जयघोष आणि वाद्यांच्या गजरात गणपतीचे आगमन झाले असून, संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आयोजित ही शोभायात्रा रविवारी सायंकाळी शहापूर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानापासून दिमाखात सुरू झाली. नूतन गणेश मूर्ती, कलश आणि उत्सव मूर्तीसह ही मिरवणूक मुख्य रस्त्यांवरून जात असताना भक्तांनी पुष्पवृष्टी केली. सुहासिनींनी पूर्णकुंभ धारण केल्याने मिरवणुकीची शोभा अधिकच वाढली होती. विविध वाद्यवृंदांच्या तालावर भक्त मंत्रमुग्ध होऊन नाचले आणि मंदिर जीर्णोद्धाराचा आनंद साजरा केला.

न्यू गुडशेड रोडवरील ५ व्या क्रॉसमध्ये असलेल्या मंदिरात मूर्तीचे आगमन झाल्यानंतर विशेष पूजा अर्चा करण्यात आली. यामुळे ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नवग्रह वास्तुपूजा आणि प्राणप्रतिष्ठापना महोत्सवाचा अधिकृत प्रारंभ झाला आहे. या धार्मिक कार्यक्रमाविषयी किरण जाधव यांनी इन न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली.

श्री गणेश सेवा विकास मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशांनी या शोभायात्रेच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांच्या शिस्तबद्ध वर्तणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Tags: