स्वातंत्र्योत्तर भारतातील हे सर्वात मोठे बजेट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मितीवर भर देऊन महात्मा गांधींचे स्वप्न साकार केले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर आधारित हे भविष्याचा वेध घेणारे बजेट असल्याचे मत चित्रदुर्गचे खासदार गोविंद कारजोळ यांनी विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कर्नाटक राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनावर टीका करताना गोविंद कारजोळ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. जवाहर रोजगार योजना सुरू झाली तेव्हाच तिला गांधीजींचे नाव द्यायला हवे होते, मात्र काँग्रेसने सत्तेत असताना गांधीजींच्या नावाचा विसर पाडला, असा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारने साबरमती योजनेच्या माध्यमातून नदीचे पुनरुज्जीवन केल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गांधीजींच्या नावाने एक तरी ठोस कार्य केले आहे का, असा सवाल करत बनावट गांधींच्या नावाने योजना राबवून लोकांची फसवणूक करणे हाच काँग्रेसचा उद्योग असल्याची टीका गोविंद कारजोळ यांनी केली.

बजेटमधील तरतुदींचे समर्थन करताना कारजोळ यांनी स्पष्ट केले की, महात्मा गांधींचे नाव हटवून त्या जागी मोदीजींचे नाव देण्यात आलेले नाही. उलट १०० दिवसांचा रोजगार आता १२० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. मान्सून आणि हिवाळी हंगामात प्रत्येकी ३० दिवसांचा अतिरिक्त रोजगार दिला असून ग्रामपंचायतींचे अधिकार काढून घेतलेले नाहीत, असे गोविंद कारजोळ यांनी म्हटले.
केंद्राने सादर केलेले बजेट अत्यंत उत्कृष्ट असून औषधांवरील कर कमी करण्यात आला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच कायम ठेवण्यात आले आहे. देशात मधुमेह आणि कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्याने औषधे स्वस्त करण्याचा निर्णय जनहितार्थ असल्याचे खासदार गोविंद कारजोळ यांनी म्हटले.
या पत्रकार परिषदेला माजी विधान परिषद सदस्य अरुण शहापूर, जिल्हाध्यक्ष गुरुुलिंगप्पा अंगडी उपस्थित होते.


Recent Comments