Belagavi

बेळगावात उद्या ‘विराट हिंदू समावेश’; भगव्या रॅलीने अवघे शहर दुमदुमले

Share

सदाशिवनगर येथील हिंदू संमेलन समितीच्या वतीने “हिंदव: सोदरा सर्वे” या घोषवाक्यासह रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भव्य ‘हिंदू समावेश’ आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज शहरात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने भगवे वातावरण निर्माण केले असून संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आज सकाळी नेहरू नगर येथील श्री बसवण्णा मंदिरापासून या भव्य बाईक रॅलीला प्रारंभ झाला. भगवान चौक, सदाशिवनगर, बेलदार छावणी, हरिद्रा गणेश मंदिर, आंबेडकर नगर मुख्य रस्ता, शिवालय रोड, रेल्वे नगर आणि जाधव नगर या प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रॅलीचा समारोप हनुमान नगर चौक येथे झाला.

रॅलींनंतर आयोजित पत्रकार परिषदेत समितीच्या गौरव अध्यक्षा रत्नप्रभा बेलद आणि अध्यक्ष मारुती मासेकर यांनी माहिती दिली की, या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वकील लक्ष्मण नायक आणि संस्कृत भारतीचे प्रांत मंत्री श्रीकांत कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. मुख्य वक्त्या म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या चिकोडी जिल्हा कार्यवाह अनुषा कौशिक मार्गदर्शन करतील.

अक्कलगी-कुंदरगी येथील श्री अडवी सिद्धेश्वर मठाचे परमपूज्य श्री अमरेश्वर महास्वामीजी या संमेलनाचे दिव्य सानिध्य भूषवणार आहेत. सदाशिवनगर येथील गाणीग समाजाच्या मैदानावर होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याला समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: