Belagavi

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई

Share

स्वच्छ बेळगाव मोहिमेअंतर्गत महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून रस्त्याकडेला कचरा फेकून शहर विद्रूप करणाऱ्यांना दणका देण्यास सुरुवात केली आहे. घंटागाडीत कचरा न देता रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना हजारो रुपयांचा दंड आकारून प्रशासनाने कडक इशारा दिला आहे.

महानगरपालिकेने स्वच्छतेला प्राधान्य देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील खासबाग येथील टीचर्स कॉलनीमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावून अधिकाऱ्यांनी दणका दिला आहे. घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या गाड्या येत असतानाही बेजबाबदारपणे कचरा फेकणाऱ्यांविरुद्ध हे दंडास्त्र उगारण्यात आले आहे. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा सक्तीने वेगळा करून द्यावा, यासाठीही अधिकारी आता जनजागृती करत आहेत.

केवळ नागरिकच नव्हे तर वैद्यकीय कचऱ्याची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्यांविरुद्धही पालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी नगर येथील चौथ्या गल्लीत असलेल्या ‘श्री क्लिनिक’ने वैद्यकीय कचरा संकलन गाडीत न देता रस्त्यावर टाकला होता, याबद्दल क्लिनिकला ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. शहर आणि बाजारपेठ भागात सकाळी व रात्री अशा दोन वेळा कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात आली असून व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. नागरिकांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा, अन्यथा मोठ्या दंडाला सामोरे जावे लागेल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Tags: