Vijayapura

विजापूरमध्ये भूमाफियांचे धाबे दणाणले; १५८ एकर जमीन मूळ मालकांना परत

Share

विजापूर जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या काळात झालेल्या जमीन बळकावल्याच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील एकूण २७ प्रकरणांचा तपास पूर्ण करून २०० आरोपींविरुद्ध न्यायालयात अंतिम अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.

विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी केली. यापैकी २५ प्रकरणांमध्ये जमिनीची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले आहे. तपासाअंती १५८ एकर १३ गुंठे जमीन आणि ९ एनए प्लॉट मूळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात आले आहेत.

तपासात असे समोर आले आहे की, मूळ जमीन मालकांच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये खरेदी-विक्रीचे खोटे व्यवहार करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सुमारे २०० आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या भूमाफिया टोळ्यांमध्ये बॉण्ड रायटर्स, एजंट आणि मध्यस्थांचा समावेश होता. जे मालक वृद्ध आहेत, एकटे राहतात किंवा जमिनीपासून दूर शहरात राहतात, अशा लोकांना हे माफिया लक्ष्य करत होते. या प्रकरणांचा यशस्वी तपास करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले आहे.

Tags: