बेळगावमधील भडकल गल्ली येथील देवांग समाजाच्या श्री बनशंकरी मंदिरात वार्षिक यात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या रविवारी देवीचा पालखी सोहळा आणि महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव शहराच्या ऐतिहासिक भडकल गल्लीतील श्री बनशंकरी मंदिरात गेल्या बुधवारपासून विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला असून, उद्या (१ फेब्रुवारी) यात्रोत्सवाची सांगता आणि सार्वजनिक उत्सव साजरा होणार आहे. मंदिरात आतापर्यंत दुर्गा सप्तशती पारायण आणि नवचंडी होम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले आहेत. उद्या पहाटे ५ वाजल्यापासून देवीला विशेष महाभिषेक आणि पूजा केली जाईल, त्यानंतर सुवासिनींकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.
यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला श्री देवीचा पालखी सोहळा उद्या सकाळी ८ वाजता सुरू होईल, ज्यामध्ये शेकडो सुवासिनी कुंभ घेऊन सहभागी होणार आहेत. दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी भव्य महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये बेळगाव शहर आणि परिसरातील समाज बांधवांनी तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बनशंकरी मंदिर ट्रस्ट कमिटीच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.


Recent Comments