Belagavi

सायबर गुन्हेगारांचा नवा ‘स्केट’; ओटीपीशिवाय बेळगावमधील व्यक्तीची १८ लाखांची लूट

Share

सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची एक नवी आणि अत्यंत घातक पद्धत अवलंबली आहे. ‘डार्क वेब’वरून ग्राहकांची वैयक्तिक माहिती मिळवून थेट बँक खात्यांना सुरुंग लावण्याचे प्रकार बेळगावमध्ये उघडकीस आले असून एका व्यक्तीला १८ लाखांचा फटका बसला आहे.

सायबर भामटे सुरुवातीला ग्राहकांच्या मोबाईलवर ‘कॉल फॉरवर्डिंग’ सक्रिय करतात. त्यानंतर ओटीपी ऐवजी ‘व्हॉईस ओव्हर कॉल व्हेरिफिकेशन’ या तंत्राचा वापर करून बँक खात्यातून पैसे लंपास करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कुंदननगरी बेळगावमधील निलेश देमजी यांच्या बँक खात्यातून तब्बल १८ लाख रुपये बेकायदेशीरपणे वळवण्यात आले आहेत. याप्रकरणी बेळगावच्या ‘सीईएन’ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

डार्क वेबवर सायबर गुन्हेगारांना ग्राहकांचा डेटा विकला जात असून, त्याचाच आधार घेऊन ही लूट केली जात आहे. सामान्यतः ओटीपी मागितल्यास लोकांना सायबर फसवणुकीची शंका येते, त्यामुळे भामट्यांनी आता ही नवी युक्ती शोधली आहे. एखादे मोबाईल ॲप्लिकेशन अपडेट करण्याच्या बहाण्याने कॉल करून एक ‘कोड नंबर’ डायल करण्यास सांगितले जाते. याद्वारे कॉल फॉरवर्ड करून बँक खात्यावर डल्ला मारला जातो.

अनोळखी कॉल्स, थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स आणि अनोळखी कोड डायल करण्याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बेळगावच्या ‘सीईएन’ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधमोहीम तीव्र केली आहे.

Tags: