मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दाता आणि स्वीकारणारा यांचा रक्तगट एकच असणे अनिवार्य मानले जाते, मात्र बेळगावच्या सेंट्राकेअर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे. पती-पत्नीचा रक्तगट वेगळा असूनही यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी रुग्णाला नवे आयुष्य दिले आहे.

बेळगावमधील टिळकवाडी येथील सेंट्राकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उत्तर कर्नाटकातील ही दुर्मिळ वैद्यकीय किमया साधली गेली आहे. हुक्केरी तालुक्यातील ४७ वर्षीय व्यक्तीला त्यांच्या पत्नीने दिलेली किडनी यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आली. विशेष म्हणजे, पतीचा रक्तगट ‘बी +’ असताना किडनी दान करणाऱ्या पत्नीचा रक्तगट ‘A+’ होता. अशा प्रकारे रक्तगट न जुळता केलेली ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून बेळगावमध्ये ती प्रथमच इतक्या यशस्वीरीत्या पार पडली आहे.
गेल्या १२ वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या या रुग्णावर ‘प्लाझ्माफेरेसिस’ आणि विशेष ‘डिसेन्सिटायझेशन’ उपचार करून शरीरातील ‘प्रतिपिंडे’ नियंत्रित करण्यात आली. मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. आंजनेय यडूर, डॉ. अविनाश ओदुगौडर, डॉ. भुवनेश आराध्य आणि डॉ. अजय शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे धाडस केले आहे. हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ. नीता देशपांडे यांनी ही कामगिरी रुग्णालयाच्या इतिहासातील महत्त्वाचा मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे. सध्या दांपत्याची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.


Recent Comments