Belagavi

४०० कोटींच्या दरोड्यात कर्नाटक पोलिसांचा हात नाही: गृहमंत्री परमेश्वर

Share

बेळगाव सीमाभागात झालेल्या ४०० कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणात कर्नाटक पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी फेटाळून लावला आहे. म्हैसूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि विविध राजकीय घडामोडींवर स्पष्टीकरण दिले.

४०० कोटींच्या दरोड्याचा तपास सध्या महाराष्ट्र पोलीस करत असून, एसआयटीचा (SIT) अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील सत्यता समोर येईल, असे डॉ. जी. परमेश्वर यांनी म्हटले. महाराष्ट्र पोलिसांच्या तपासात कर्नाटक पोलिसांचा हस्तक्षेप किंवा सहभाग नसल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

मंत्री के. जे. जॉर्ज यांच्या राजीनाम्याबाबत समाजमाध्यमांवर सुरू असलेली चर्चा केवळ अफवा असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. जुन्या आणि नव्या काही लोकांनी मुद्दाम ही खोटी बातमी पसरवली असून स्वतः जॉर्ज यांनीही यावर स्पष्टीकरण दिले असल्याचे डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले.

म्हैसूरमधील अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) छाप्याबाबत माहिती देताना त्यांनी तिथे कोणतेही अमली पदार्थ सापडले नसल्याचे सांगितले. तो छापा केवळ फिनाईल तयार करणाऱ्या कारखान्यावर होता आणि तपासाचा भाग म्हणून जुन्या आरोपींच्या नातेवाईकांकडे विचारपूस करण्यात आली, असे डॉ. जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले.

राज्यात गाजलेल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणाबाजीच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी हे प्रकरण सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगितले. पोलिसांना तपासाबाबत कोणत्याही विशेष सूचना देता येत नाहीत आणि सरकार न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याची प्रतिक्रिया डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली.

Tags: