चिक्कोडी येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींची नेटबॉल क्रीडा प्रकारात सन २०२५-२६ या वर्षासाठी ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ म्हणून निवड झाली असून, त्या राष्ट्रीय स्तरावर विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे (व्हीटीयू) प्रतिनिधित्व करणार आहेत.

केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निशा मानगावे, शोभा मुरचट्टी आणि सपना खोत या विद्यार्थिनींची विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या नेटबॉल संघात निवड झाली आहे. ही महाविद्यालयासाठी गौरवाची बाब असल्याचे प्राचार्य डॉ. दर्शनकुमार बिल्लूर यांनी नमूद केले. आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथील कृष्णा विद्यापीठात १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ नेटबॉल स्पर्धेत या विद्यार्थिनी ‘व्हीटीयू’ संघाचे प्रतिनिधित्व करतील.
या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक गणपती हुलिगेज्जी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी क्रीडा समन्वयक डॉ. अरविंद देशी, शैक्षणिक समन्वयक प्रा. कुमार चौगुला उपस्थित होते. या यशाबद्दल विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments