कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी स्थलांतरितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ देशाबाहेर काढण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी आक्रमक मागणी विजापूर शहरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात केली आहे.

आमदार यत्नाळ यांनी यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले होते. आता त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. “राज्यात सुमारे २५ लाख बांगलादेशी नागरिक अवैधपणे वास्तव्य करत आहेत. हे घुसखोर राज्याच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून, त्यांना तात्काळ शोधून हद्दपार करणे गरजेचे आहे,” असे यत्नाळ यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अवैध बांगलादेशींची माहिती देणाऱ्या आणि त्यांचा पर्दाफाश करणाऱ्या हिंदू नेत्यांवर पोलीस गुन्हे दाखल करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा नेत्यांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्यावरच कारवाई करणे थांबवावे,” असे त्यांनी बजावले. या प्रश्नावरून अधिवेशनात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.


Recent Comments