बेळगाव जिल्ह्यात मालमत्ता नोंदणीच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि तोतयागिरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नोंदणी प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले असून, हा आदेश आजपासूनच लागू करण्यात आला आहे.

मालमत्तेशी संबंधित गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता राखण्यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयांमध्ये खरेदीदार, विक्रेते, देणगीदार आणि स्वीकारणारे यांसह सर्व संबंधित पक्षांचे आधार आधारित प्रमाणीकरण करणे आता सक्तीचे आहे. यामुळे बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता हडपणाऱ्या टोळ्यांना मोठा चाप बसणार असल्याचे मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.
यापुढे कुलमुखत्यारपत्राद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठीही कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. केवळ नोंदणीकृत जीपीएचाच विचार केला जाईल आणि जीपीए देणारी व्यक्ती हयात असल्याबाबत संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून ‘जिवंत असल्याचा दाखला’ घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.


Recent Comments