राज्य महापालिका निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सर्वसाधारण सभेत निवृत्तांच्या पेन्शन आणि मूलभूत सुविधांबाबत उद्भवलेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


बेळगाव येथील सदाशिवनगरमधील रेड्डी भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना राज्य संघटनेचे अध्यक्ष वीरभद्र शिंपी यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. महापालिका कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करून समाजाची प्रामाणिक सेवा केली आहे, मात्र निवृत्तीनंतर त्यांना वेतन आणि पेन्शनसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी २४८ ए सेवा लागू झाली असून, उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे मत वीरभद्र शिंपी यांनी व्यक्त केले.

या सभेत बेळगाव महापालिका निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नागगौडा एस. बी. यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात नामवंत उद्योजक विठ्ठल हेगडे, तारानाथ शेट्टी, मल्लिकार्जुन जगजंपी आणि एन. एस. चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. या अधिवेशनासाठी राज्यातील विविध शहरांतून महापालिकांचे निवृत्त पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments