बेळगावच्या डीवायईएस क्रीडा वसतिगृहातील ज्युडो खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले असून मणिपूर आणि कोलकाता येथे झालेल्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये पदके जिंकून राज्याचा गौरव उंचावला आहे.

मणिपूर येथे आयोजित ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजली पाटील हिने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. तिने पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान आणि मणिपूरच्या बलाढ्य स्पर्धकांचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात तिने झुंजार लढा देत द्वितीय स्थान मिळवले. त्याचप्रमाणे, कोलकाता येथे पार पडलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये सैश्वरी के. हिने जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या खेळाडूंना नमवत कांस्य पदक जिंकले.
हे यशस्वी खेळाडू बेळगाव जिल्हा क्रीडा संकुलात एनआयएस प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या ऐतिहासिक यशाबद्दल क्रीडा विभागाचे उपसंचालक श्रीनिवास बी. यांनी खेळाडूंचे कौतुक केले असून, हा विजय डीवायईएस क्रीडा वसतिगृहातील दर्जेदार प्रशिक्षणाचे फळ असल्याची भावना क्रीडा क्षेत्रात व्यक्त होत आहे.


Recent Comments