धारवाडमध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या बलिदान दिनाच्या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण नाकारत मंत्री संतोष लाड यांनी आयोजकांना उद्धटपणे सुनावले. या प्रकारामुळे धारवाडमधील रायण्णा प्रेमी आणि कुरुबा समाजामध्ये मंत्र्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

धारवाडमधील संगोळी रायण्णा चौकात सोमवारी क्रांतीवीर संगोळी रायण्णा मंडळाच्या वतीने हुतात्मा दिन साजरा केला जात होता. यावेळी मंत्री संतोष लाड शेजारीच असलेल्या एका कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी आले होते. त्यांना पाहताच आयोजकांनी रायण्णा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी निमंत्रित केले. मात्र, “तुम्ही फक्त हेच करत राहा, कोणाचाही फोटो ठेवून आम्हाला पुष्पहार अर्पण करायला बोलावा,” अशा शब्दांत मंत्र्यांनी आयोजकांना सुनावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी कुरुबा समाजाचे नेते आणि मनसूरचे बसवराज देवू यांनी धारवाडमध्ये निदर्शने केली. मंत्र्यांचे हे वागणे राष्ट्रपुरुषाचा अवमान करणारे असून संतोष लाड यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. माफी न मागितल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुरुबा समाजाच्या नेत्यांनी दिला असल्याचे रायप्पा यांनी म्हटले आहे.


Recent Comments