बेळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखला देणाऱ्या कार्यालयाचे शटर तांत्रिक बिघाडामुळे अडकल्याने आत असलेले कर्मचारी आणि नागरिक तब्बल अर्धा तास अडकून पडल्याची घटना आज घडली.

महापालिका आवारातील या कार्यालयाचे शटर उघडत नसल्याने कर्मचारी आणि दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी फजिती झाली. शटर उघडण्यासाठी उपस्थित नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तांत्रिक बिघाडामुळे ते वर सरकत नव्हते. यामुळे कार्यालयामध्ये गोंधळाचे आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
एकीकडे शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास होत असताना महापालिकेच्या स्वतःच्या कार्यालयाची ही स्थिती असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला. कार्यालयांची योग्य निगा न राखल्यामुळेच अशा घटना घडत असून सामान्य माणसाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी दिली.


Recent Comments