सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख ६० हजार पार गेल्याने आता दरोडेखोरांनी आपला मोर्चा सराफी दुकानांकडे वळवला आहे. विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हलसंगी गावात भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


महरुद्र कंचगार यांच्या दुकानात शिरलेल्या दोन बुरखाधारी टोळीने गोळीबार करत सोने लुटले असून, पोलीस आता आरोपींच्या शोधात आहेत. हलसंगी गावात प्रजासत्ताक दिनीच हा थरार घडल्याने नागरिक हादरून गेले आहेत. हेल्मेट घालून बुलेटवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी ‘कंट्री पिस्तूल’चा धाक दाखवत सराफी दुकानावर हल्ला चढवला. दरोडेखोरांनी आधीच प्लॅन केल्यानुसार हेल्मेट, जॅकेट आणि हातमोजे घातले होते. दुकानात शिरताच त्यांनी मालकाला धमकावून सर्व सोन्याचे दागिने पिशवीत भरले. ही सर्व दृश्ये जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
दरोडा सुरू असताना एक वृद्ध महिला योगायोगाने दुकानाजवळ आली, तेव्हा दरोडेखोरांनी तिच्यावरही पिस्तूल रोखून तिला पळवून लावले. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दरोडेखोरांनी हवेत दोन राऊंड फायर केले. यावेळी आत्मलिंग हुगार या तरुणाच्या उजव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून, त्याला विजापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लूट केल्यानंतर आरोपी क्षणात महाराष्ट्र सीमेच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच विजापूरचे एसपी लक्ष्मण निंबरगी, एएसपी रामनगौडा हट्टी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झळकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध पथके तयार केली आहेत. हलसंगी हे सीमावर्ती गाव असल्याने हे दरोडेखोर शेजारील महाराष्ट्रातून आले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments