बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने पुकारलेल्या देशव्यापी संपाला बेळगावात मोठा प्रतिसाद मिळाला. कर्मचाऱ्यांनी आज कामकाज बंद ठेवून निदर्शने केल्यामुळे बँकिंग सेवा पूर्णपणे कोलमडली होती.


बेळगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून आज कर्मचाऱ्यांनी भव्य निषेध रॅली काढली. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मार्च २०२४ मध्ये इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात यासंदर्भात ऐतिहासिक करार होऊनही गेल्या दोन वर्षांपासून हा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाभर बँकिंग सेवा बंद ठेवून रस्त्यावर उतरल्याची प्रतिक्रिया महिला आंदोलकांनी व्यक्त केली.
विजया हिरेमठ यांनी यावेळी प्रशासनाचा निषेध केला. सध्या दुसरा आणि चौथा शनिवार सुटी दिली जाते, मात्र आता सर्व शनिवारी सुटी जाहीर करण्याची मागणी आहे. त्याऐवजी सोमवार ते शुक्रवार दररोज ४० मिनिटे अतिरिक्त काम करण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दर्शवली आहे. या प्रस्तावाला ‘आयबीए’ने संमती दिली असतानाही केंद्रीय वित्त मंत्रालय अंतिम मंजुरी देण्यास विलंब लावत असून हा कर्मचाऱ्यांच्या हितावर घाला असल्याचे विजया हिरेमठ यांनी म्हटले आहे.
जर सरकारने तातडीने या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा सुधीर चिक्कोडी यांनी दिला आहे.
या आंदोलनात बेळगाव युनिटचे प्रमुख संपदा क्षीरसागर, सुनील एस. यांसह शेकडो बँक कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments