Belagavi

बेळगावमध्ये स्केटर्सकडून प्रजासत्ताक दिनाचा अनोखा उत्साह

Share

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. हातात तिरंगा घेऊन स्केटिंग करत खेळाडूंनी आपले देशप्रेम व्यक्त केले.

बेळगाव शहरातील कॉर्पोरेशन स्केटिंग रिंक येथे ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये ३ ते २५ वयोगटातील सुमारे ४० हून अधिक स्केटर्स सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या खेळाडूंनी सतत ७७ मिनिटे न थांबता स्केटिंग करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हातात राष्ट्रध्वज घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘हर घर तिरंगा’ अशा घोषणा देत स्केटिंग केल्यामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी या रॅलीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला योगेश कुलकर्णी, तुकाराम पाटील, सागर चौगुले यांच्यासह अनेक पालक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. शल्य तारलेकर, प्रांजल पाटील, आर्या कदम यांसह अनेक उदयोन्मुख स्केटर्सनी या साहसी रॅलीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आनंद साजरा केला.

Tags: