Belagavi

केएलएस आयएमईआर पदवी प्रदान सोहळा: शिस्तबद्ध आणि नैतिक जीवनच यशाची गुरुकिल्ली; कुलगुरू प्रो. सी. एम. त्यागराज

Share

बेळगाव येथील ‘केएलएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च’ या स्वायत्त संस्थेचा चौथा पदवी प्रदान सोहळा आज महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या थाटात पार पडला.

यावेळी विद्यमान शैक्षणिक वर्षातील एमबीए बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल पदव्या प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘कर्नाटक लॉ सोसायटी’चे अध्यक्ष प्रदीप सावरकर होते. तर मुख्य अतिथी म्हणून चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सी. एम. त्यागराज हे उपस्थित होते.

मुख्य अतिथी कुलगुरू प्रो. सी. एम. त्यागराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यवस्थापन क्षेत्रात नैतिकता आणि नियमबद्ध जीवन हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आयुष्य हे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखे असून, व्यावसायिक जगात वावरताना केवळ ज्ञान असून चालत नाही, तर त्याला आत्मविश्वासाची आणि मूल्यांची जोड असणे आवश्यक आहे. नवनवीन गोष्टींचा ध्यास घेताना विद्यार्थ्यांनी न्याय आणि शिस्त कधीही विसरू नये; कारण नियमांशिवाय असलेले जीवन व्यर्थ असून, आपले कार्य, सेवा आणि कौशल्य हेच जीवनाचे खरे नियम असावेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या सोहळ्याला विशेष निमंत्रित म्हणून अहमदाबाद आयआयएमचे माजी प्राध्यापक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अनिल गुप्ता उपस्थित होते. त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी व्यवस्थापन क्षेत्रात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

याप्रसंगी कर्नाटक लॉ सोसायटीचे चेअरमन ए. के. टगरे, आयएमईआर प्रशासकीय मंडळाचे चेअरमन उदय कालकुंद्रिकर, सचिव व्ही. एम. देशपांडे आणि एस. व्ही. गणाचारी उपस्थित होते. आयएमईआरचे संचालक डॉ. आरिफ शेख यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: