बेळगाव महानगरपालिकेच्या जन्म आणि मृत्यू दाखला विभागातील वाढत्या गर्दीची दखल घेत महापौर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली असून यामुळे नागरिकांच्या समस्या सुटण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्या या विभागात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून रांगेत उभे राहून लोकांचे हाल होत होते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी नगरसेवकांच्या पथकासह कार्यालयाला अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
कार्यालयातील अपुरी जागा आणि नागरिकांना होणारा मनस्ताप पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केवळ पाहणी न करता गर्दी कमी करण्यासाठी हा विभाग त्वरित विस्तारित करण्याचे निर्देश महापौर मंगेश पवार यांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार, जन्म-मृत्यू विभागात अतिरिक्त काउंटर सुरू करण्यात येणार असून नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच दाखले मिळवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी विशेष पावले उचलली जाणार आहेत. ही विस्तार योजना पूर्ण झाल्यानंतर बेळगावातील जनतेला तासनतास रांगेत उभे राहावे लागणार नाही, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Recent Comments